शेततळे – शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत जलस्रोत

 पर्यावरणात होणारे खूप मोठे बदल यामुळे दिवसेंदिवस पाण्याची टंचाई निर्माण होत चालली आहे मुख्य जलस्रोत आटत चालले आहे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी देखील शेतीसाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई आता भासू लागली आहे आणि भविष्यात अजूनच ती भासू शकते. उन्हाळ्यामध्ये हातातोंडाशी आलेले उभे पिक पाण्याची अभावी करपून जात आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे यासाठीच शेतकऱ्यांना थोड्या कालावधीची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी एखाद्या शाश्वत जलस्रोताची आवश्यकता आहे.

शेततळे हे त्यावरच एक उपाय आपण म्हणू शकतो. पावसाळ्यामध्ये किंवा जेव्हा पाण्याची उपलब्धता असते त्यावेळी जर आपण भरून पाणी भरून ठेवले तर त्याचा उपयोग आपल्याला पाणीटंचाईच्या काळात खूप चांगल्या प्रकारे करता येतो. 

शेततळे तयार करण्याअगोदर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात विविध प्रश्न असतात. जे आमच्याही मनात होते त्यामुळेच एक सारासार मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करत आहे ज्यातून थोड्याफार माहितीचा आणि बजेटचा अंदाज आपल्याला येईल.

शेततळ्याचे माप ?

साधारणपणे शासनाने काही मार्गदर्शक मापे दिली आहे ज्यात सर्व प्रकारांमध्ये शेततळ्याची खोली ही कमीत कमी तीन मीटर्स इतकी असावी व लांबी आणि रुंदी १५ x १५ मीटर्स, १५ x २० मीटर्स, २० x २० मीटर्स, २० x २५ मीटर्स, २५ x २५ मीटर्स, २५ x ३० मीटर्स आणि ३० x ३० मीटर्स अशा प्रमाणे असाव्यात.

परंतु आपली गरज आणि आपन जी जमीन निवडलेली आहे त्याचे जे आपल्याला आवश्यक आकारमान आहे त्यानुसार आपण आकारमान निश्चित करू शकता.

आम्ही शेततळे पूर्ण केले आहे त्याचेच उदाहरण देऊन पुढील गोष्टी मांडत आहे.

शेततळे संपूर्ण प्रात्येक्षिक व्हीडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :- https://youtu.be/blUZ05Gge4U

आम्ही हे आकारमान ३० मीटर x १५ मीटर असे घेतले आहे.

पोकलेन मशीनच्या सहाय्याने हे खोदण्यासाठी साधारण आपल्याला चार ते पाच दिवस लागतात. संपूर्ण कामासाठी  ४० ते  ५० तासांची मशीन कामाची गरज लागेल. यामध्ये जर खाली खडक लागला तर आपल्याला फाईटदेण्याची आवश्यकता असते. शेततळे खोदताना ज्या पोकलेन मशीनधारकाला खोदकाम करण्याचा अनुभव असेल अशा मशीनचा शक्यतो वापर करा जेणेकरून शेततळे लवकर आणि व्यवस्थित होते ज्याची इतर मशागत नंतर करावी लागत नाही. ( वरील काम कमीत कमी दिवसात व कमी खर्चात तयार केलेल्या पोकलेन मशीन प्रतिनिधीची माहिती मी इथे देत आहे  – श्री. प्रफुल्ल इथापे,  मोबाईल – ९५०३६६६६८८ ) 

पोकलेन मशीनचा ताशी दर हा २००० ते २२०० रुपये प्रतितास असा चालू आहे. 

सारासार विचार केला तर हे शेततळे पूर्ण खोदकाम करण्यासाठी त्यामध्ये पोकलेन मशीन, फाईट आणि इतर मजुरी धरून साधारण एक लाख रुपये खर्च येतो.

शेततळे एकदा पूर्ण झाल्यानंतर त्याला व्यवस्थित आतील बाजूस आवश्यकता असल्यास पाणी मारून दाबून घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये असणारे छोटे मोठे दगड उचलून घेणे आवश्यक आहे. 

हे काम पूर्ण झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेततळ्यासाठी प्लास्टिक.

यासाठी आपल्याला कमीत कमी ५०० मायक्रोनचा प्लास्टिक कागद आवश्यक आहे. मार्केट मधे बऱ्याच कंपन्या हा प्लास्टिक पूरवतात यामध्ये प्रामुख्याने अवाना शेततळे प्लास्टिक, आदिप्लास्टिक कोल्हापूर अशा कंपन्यांचा समावेश आहे. 

यामध्ये साधारण २ प्रकारचे कागद आपल्याला बघायला मिळतात एक काळा आणि एक आकाशी.

काळा कागद हा पारंपारिक पाणी साठविण्यासाठी वापरला जातो तर आकाशी कागद हा जर आपल्याला भविष्यात मस्त्यपालन करायचे असल्यास चांगला उपयोगात येतो. ज्यामध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकाने माशांना मिळते जे काळ्या कागदात तुलनेने कमी मिळते त्यामुळेच या कागदाचा दर हा १० रुपयांपर्यंत अधिक असतो.

साधारणपणे काळ्या रंगाच्या प्लास्टिकचा दर हा ९३ ते ९६ रुपये प्रती चौरस मीटर असा आहे. 

तर आकाशी रंगाच्या प्लास्टिकचा दर १०३ ते १०६ रुपये प्रती चौरस मीटर असा आहे.

एकदा शेततळे पूर्ण झाल्यानंतर आपण कंपनीला फोन करून प्रतिनिधीची व्हीसिट अरेंज करायची आहे ज्यामध्ये ते आपल्याला शेततळ्यासाठी लागणारे प्लास्टिकचे मोजमाप, कागद गाडण्यासाठीची चारीची माहिती तथा इतर त्रुटी असतील त्या सांगतात.

वरील शेततळ्यासाठी आपण अवाना शेततळे प्लास्टिक वापरले आहे जे आकाशी रंगाचे आहे. ( कंपनी प्रतिनिधी : आकाश गायकवाड , मोबाईल – ८०५५०७५२९३ ) वरील शेततळ्यासाठी आपल्याला साधारण १००० चौरस मीटर कागदाची गरज पडली. ज्याचा दर हा १०५ रुपये प्रतीचौरस मीटर प्रमाणे आहे. यामध्ये सर्व वाहतूकपासून ते फीटिंग पर्यंत सर्व खर्च कंपनीकडून केला जातो. या कागदाची कंपनी वॉरंटी पाच वर्षाची असते परंतु साधारणपणे १० ते १५ वर्ष याची लाइफ मिळू  शकत.

प्लास्टिक अस्तारीकरन करताना आपल्याला साधारणपणे १० ते १५ व्यक्तींची गरज लागते. कागद टाकून झाल्यानंतर मातीने भरलेल्या गोनी या ठराविक अंतरावर ठेवल्या जातात. त्यानंतर आपण तळ्यामध्ये पाणी सोडू शकतो. पाणी सोडल्यानंतर ज्या ठिकाणी कागद ओढला गेला आहे त्याठिकाणी गोणी व्यवस्थित करून नंतर वरील बाजूच्या चारीमध्ये कागद गाडून घेऊ शकता.

यानंतर सर्वात महत्वाचे काम म्हणजे तळ्यासाठी चारही बाजूने कंपाऊंड करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला  पाच फुट उंच आणि कमीत कमी २ ते ३ इंच जाळीची गरज लागेल. यासाठी देखील आपल्याला मजुरीसह साधारणपणे ४०० फुट रनिंग मीटर साठी ५०,००० खर्च येतो.

आता सर्वात महत्वाचा प्रश्न … शासकीय अनुदान ?

शेततळ्यासाठी पुढील प्रमाणे शासकिय अनुदान आहे.

मागेल त्याला शेततळे – साधारणपणे ५०००० रुपये (  लिंक – https://egs.mahaonline.gov.in/  )

महाडीबीटी पोर्टल – लॉटरी मधे नाव आले तर साधारणपणे ५०००० रुपये ( लिंक – https://mahadbtmahait.gov.in/Farmer    )

महाडीबीटी पोकरा – विशीष्ट जिल्हे मुख्यत: मराठवाडा, विदर्भ यामध्ये खोदकाम व प्लास्टिक दोन्हीसाठी अनुदान आहे. ( लिंक – https://dbt.mahapocra.gov.in/ )

अल्पभूधारक शेतकरी, मनरेगा अंतर्गत – ग्रामपंचायत द्वारे अर्ज करू शकता 

वरील सर्व योजना जानेवारी २०२० पासून कोविडमुळे बंद आहेत त्यामुळे त्या कधी चालू होतील यासाठी आपण आपल्या कृषी सहयाकाशी संपर्कात राहा.   

वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर साधारण पणे १५ मीटर x ३० मीटर x ९ मीटर खोली शेततळ्यासाठी आपल्याला अडीच लाख पर्यंत खर्च लागतो आणि या शेततळ्याची साठवण क्षमता साधणपणे २५ लाख लिटर मिळू शकते.

शेततळ्यात साठवलेले पाणी कसे वापरले जाऊ शकेल?

शेततळं हे शेतापेक्षा उंच भागात असेल तर पाणी हाताने सायफन पद्धतीने / एयर प्रेशर पद्धतीने वापरात आणले जाऊ शकते.

जर तुमचे शेततळं हे तुमच्या शेतापेक्षा खालच्या पातळीत असेल तर तुम्हाला विजेवर चालणारा किंवा डीजेल पंप वापरावा लागेल.

आपण अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि शेततळ्यातील पाणी हे मर्यादित आहे आणि त्याचा वापर संरक्षित सिंचन म्हणून व्हायला हवा. कमी पाण्याची गरज असणारे फलोत्पादन लागवड, भाज्या आणि फुलशेतीला प्राधान्य दिला गेला पाहिजे.

सिंचन हे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पध्दतीने केले जावे ज्यामुळे पाण्याचा वापर जास्त कार्यक्षमतेने होईल.

दुष्काळावर उपाय म्हणून जास्तीत जास्त शेतकरी हे शेततळे बांधत आहेत. त्यामुळे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. यासाठीच मी या ब्लॉगमधे सर्वसाधारण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर कुणाला अधिक माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता. 

– गणेश दिलीप सातकर, 

+९१ ९९६०७५९०३२

मु. म्हसवंडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर – ४२२६०२  

Leave a comment