एक मैत्रिण आणि प्रसंग….!

एक मैत्रिण आणि प्रसंग….!

प्रसंग काल्पनिक परंतु वास्तववादि आहे अशा विचारातून….क्रमशः

प्रियाने आनंदात अमोलला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली.
विजय म्हणजेचं प्रियाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमोलला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे विजय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती.

अमोल शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू खूश आहे हे ऐकून छान वाटले एवढंच तो बोलला. प्रियाला त्याच्या बोलण्यात आज खूप फरक जाणवला.

प्रियाने विचारले,
‘”काय झालं अमोल, तू आज इतका शांत कसा ,
नेहमी तर माझी खिल्ली उडवत असतोस. मी किती अल्लड आहे हे मला पटवून देत असतोस, आज मी इतकी छान बातमी सांगितली पण तू मात्र आनंदी नाही असं वाटत आहे मला.

सांग ना काय झाले, तू माझ्यासाठी खूश आहेस ना”.
“प्रिया अगं मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे, तुला हवा तसा जोडीदार तुला मिळाला हे ऐकून खरंच छान वाटले मला.
तुझं विजय बद्दलच वर्णन ऐकून तू आता अल्लड नसून मॅच्युअर झाली आहे हे मला जाणवलं.

पण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आता माझ्यासोबत जास्त बोलू शकणार नाही, माझे चांगले वाईट अनुभव, माझी प्रेमप्रकरणं आता मी कुणाजवळ सांगणार, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुणाची खिल्ली उडवणार मी म्हणून जरा उदास झालो एवढंच.” अमोल बोलला.

अमोलचं उत्तर ऐकून प्रियाला काय बोलावे कळत नव्हते, काही क्षण शांतता पसरली.
एकीकडे आनंद तर एकीकडे मैत्री आता जरा कमी होणार म्हणून उदासीनता अशी दोघांची मनस्थिती झाली.

आपली मैत्री अशीच राहणार असं म्हणत प्रियाने शांतता दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर अमोल तिला समजूत सांगत म्हणाला
“प्रिया अगं तुझ्या आयुष्यात आता एक स्पेशल व्यक्ती आहे तो म्हणजे विजय, तुझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पूर्ण आयुष्य तुम्ही एकत्र घालवणार आहे, आपल्या दोघांना माहित आहे की आपण खूप छान मित्र आहोत पण सगळ्यांना अशी मैत्री पटेल असं नाही.

मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही, विजय आणि तू हे दिवस खूप एंजॉय करा. आपल्या मैत्रीमुळे त्याला उगाच काही गैरसमज नको. अधूनमधून आपण बोलायला हरकत नाही पण नको तू छान वेळ दे त्याला, समजून घे विजय ला आणि हो कधीही माझी आठवण आली, काहीही मदत लागली तर बिंदास सांग मला.”

अमोलचं हे बोलणे ऐकून प्रियाने हो..चालेल.. बाय.. टेक केअर म्हणत फोन ठेवला.

प्रिया आणि अमोल लहानपासूनचे चांगले मित्र मैत्रीण. अमोल अतिशय शांत मनमोकळ्या स्वभावाचा, नेहमी हसत खेळत, सर्वसाधारण मूडमध्ये असणारा पण सगळ्यांना मदत करायला तयार. प्रिया अगदी अल्लड, शांत, दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार पण तरीही साधी मुलगी.

पण नंतर च्या काळात प्रियाला मित्र मैत्रीणी मोजकेच होते पण त्यात अमोल तिचा चांगला मित्र होता.
त्याची सगळी प्रकरणं, मज्जा मस्ती तो तिला सांगायचा.

प्रिया किती साधी भोळी आहे, तिला कुणी किती सहज फसवू शकतं ही जाणीव तिला करून द्यायचा.
अमोलची तशी गर्लफ्रेंड नव्हती पण त्यातल्या त्यात काही खास होती. तिची आणि अमोलची निरागस वन साईड लव स्टोरी, त्यांची भांडणं, सरप्राइज अशे चांगले वाईट अनुभव तो प्रिया जवळ शेअर करायचा.

प्रिया अमोलमुळ माणसं ओळखायला शिकली होती, कुठल्याही परिस्थितीत आनंदी कशे राहायचे हे तिला अमोल मुळे कळाले होते. इतके चांगले मित्र मैत्रीण असून एकमेकांचा आदर त्यांना होता, पवित्र अशी त्यांची मैत्री होती.

….. फोन ठेवल्यानंतर प्रिया विचार करू लागली की मुलगा मुलगी ह्यांच्यात मैत्रीचं नातं नसू शकते का?
लग्न होणार म्हणून अशी मैत्री अचानक कमी का? का तर उगाच नवर्‍याला गैरसमज नको म्हणून, तिला जरा विचित्र वाटले.

आता आधी सारखा वेळ मित्र मैत्रीणी सोबत घालवता येणार नाही हे मान्य करून आता नवं आयुष्य सुरु होणार, प्रायोरिटी बदलणार हे तिला जाणवु लागलं पण नविन आयुष्यात अशा मैत्रीमुळे काय गैरसमज होतील किंवा नाही हे पण तिला कळन्या पलीकडच होत.

ज्या पवित्र मैत्रीमुळे ती खरं जीवन जगायला शिकली, माणूस ओळखायला शिकली, कुणी आपली सहज फसवणूक करू शकते पण अमोल मुळे असं काही झालं नाही, बर्‍याच नविन गोष्टी अमोल मुळे आपल्याला कळायला लागल्या हे ती कधीच विसरू शकत नव्हती.

जवळच्या आणि काळजीवाहू मित्राची गरज तेव्हा तिला रियालाईझ होऊ लागली.

आपल्या हक्काचं मित्र किंवा व्यक्ती जेव्हा काही काळ किंवा कायमच दूर जाणार या विचारानेच मनाची किती मोठी काहूर होत होती.

नेहमी प्रत्येक गोष्टींमध्ये गृहीत धरणाऱ्या आपल्या मित्राला मनाची दुसरी बाजु देखील आहे याचा प्रियाने अगोदर कधी विचारच केला नव्हता.

असं हे नातं अनोळखी का आहे याचे उत्तर मात्र तिला मिळत नव्हते….?

✍एस. गणेश

Leave a comment